नवी दिल्ली - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुध्द होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे धोनीचा क्रिकेटच्या मैदानावरिल प्रवेश लांबला असल्याचे समजते. तसेच पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही धोनी खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
आयसीसी विश्वकरंडक २०१९ च्या स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. या स्पर्धेनंतर त्याने वेस्ट इंडीज आणि मायदेशात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली. दरम्यान, सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन धोनी सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, धोनीने आपला ब्रेक अजून अडीच महिने वाढवल्याचे समजते.
हेही वाचा - कमाईत इंग्लंडचा जोफ्रा आर्चरने विराटला टाकले मागे, मिळवले इतके कोटी
धोनीने ब्रेक घेतल्यानंतर, लष्करी जवानांसोबत वेळ घालवणे पसंत केले. त्याने काश्मीरच्या खोऱ्यात जवानांसोबत गस्त घातली. यादरम्यान, त्याच्या निवृत्तीबाबतच्या अफवा पसरल्या होत्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वकरंडक स्पर्धा २०१६ चा एक धोनीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर धोनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीची घोषणा करेल, अशा चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, याविषयी माध्यमात चर्चा रंगल्यानंतर, आपण हा फोटो सहजच अपलोड केला होता, असे स्पष्टीकरण विराटने दिले. यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान, धोनीने निवृत्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - भारतीय खेळाडूंची दिवाळी यंदा जोरात, बीसीसीआयकडून दैनिक भत्ता 'डबल'