मुंबई - महेंद्रसिंह धोनीला मागील दहा वर्षात सराव शिबिरात इतकं झोकून दिल्याचे कधीच पाहिले नाही. मला वाटते की तो विश्वकरंडक स्पर्धेसाठी, भारतीय संघात परतण्यासाठी इच्छुक असून यासाठी तो कठोर मेहनत घेत आहे, असे मत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक यांनी व्यक्त केले आहे.
टॉमी सिमसेक यांनी सांगितलं की, 'आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सराव शिबिरामध्ये सर्व खेळाडू सहभागी झाले होते. यात धोनीही सामिल झाला होता. तो कस्सून सराव करत होता. याआधी मी त्याला कधीच सराव शिबीरात इतके झाकून दिल्याचे पाहिले नाही. तसेच तो मागील १० वर्षात कधी यष्टीरक्षणाचा सराव करताना दिसून आला नाही. पण त्याने यष्टीरक्षणाचा देखील सराव केला. मला वाटत की तो भारताच्या विश्वकरंडक संघात खेळण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.'
टॉमी व्यतिरिक्त चेन्नई संघाचा फिरकीपटू पियूष चावलानेही, धोनी सराव शिबीरात फुल्ल जोशमध्ये दिसत होता, असे सांगितले. शिवाय कर्ण शर्माने, धोनी दिवसाला तीन तास नेटवर सराव करत होता आणि तो त्वेषाने चेंडूवर हल्ला चढवायचा, असे सांगितले. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आयपीएल संघांनी आपले सराव शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि खेळाडूंना परत जाण्यास सांगितले होते.
दरम्यान, धोनी विश्वचषकापासून संघाबाहेर आहे. विश्वकरंडकानंतर निवड समितीने धोनीला वगळून ऋषभ पंतला संघात संधी दिली. पण पंतलाही आपली छाप सोडता आली आहे. भारतीय संघात पंत आल्यापासून, धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सद्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.
हेही वाचा - धोनी अडकलाय, त्याने विश्वकरंडकानंतरच निवृत्ती घ्यायला हवी होती, पाक क्रिकेटपटू
हेही वाचा - शाकिब आयसोलेशननंतर पोहोचला घरी, केला शेअर पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो