लंडन - सध्या इंग्लंड येथे चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत दमदार कामगिरी करत असून आतापर्यंत अपराजित राहिला आहे. या स्पर्धेत भारत आणि अफगानिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या विश्वकरंडकातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली.

भारतासाठी विश्वकरंडकात हॅट्ट्रिक घेणारा शमी हा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी १९८७ च्या विश्वषचकात भारताच्या चेतन शर्माने हॅट्ट्रिक केली होती. क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा शमी हा नववा गोलदांज आहे.

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा असा' एकमेव गोलंदाज आहे ज्याने आजवर विश्वकरंडकात दोनदा हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. मलिंगाने २००७ आणि २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेतली होती.