नवी दिल्ली - पाकिस्तानचा संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संभाव्य संघाची घोषणा केली असून यात अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफिजला संधी दिलेली नाही. यामुळे भडकलेल्या हाफिजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह प्रशिक्षक मिसबाह उल हक यांना धारेवर धरत गंभीर आरोप केले आहेत.
मोहम्मद हाफिजने एका मुलाखतीतीत मिसबाह आणि पीसीबीचा समाचार घेतला आहे. त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'मला संघ निवडीबाबत काही माहिती मिळाली आहे. मिसबाह आणि पीसीबी माझी आणि शोएब मलिकची संघात निवड करण्याबाबत इच्छुक नाहीत. सद्या आमची त्यांना गरज वाटत नाही. ही बाब ते जाहीरपणे का सांगू शकत नाहीत? तुम्ही ही गोष्ट का लपवता? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझी निवड होईल, असे मला वाटत होते. मात्र, मला संधी दिली गेली नाही.'
एकाच वेळी मिसबाह दोन महत्वाच्या जबाबदारी कशा काय पार पाडू शकतो? मिसबाहकडे प्रशिक्षक पदाचा अनुभव नाही. यामुळे तो कसा काय प्रशिक्षणात न्याय देऊ शकतो, असेही हाफिजने सांगितले. यावेळी त्याने टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलेल्या बाबर आझमला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मिसबाह उल हक यांनी सप्टेंबरमध्ये संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासह निवड समितीचीही जबाबदारी पार पाडत आहे. मिसबाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा मायदेशात टी-२० मालिकेत ३-० ने पराभव केला. त्यानंतर सरफराज अहमद याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा - वाढदिवशी वॉर्नरचा 'राडा', कांगारूंचा लंकेवर दमदार विजय
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धु..धु धुतले; कसुन राजिताच्या नावे झाला नकोसा विक्रम