मुंबई - आयपीएलच्या ५१ व्या सामन्यात मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. मुंबईने हैदराबादपुढे विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईने निर्धारित २० षटकात ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.
प्रथम मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी ३६ धावांची सलामी दिली. रोहित शर्मा २४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर डी कॉकने ५८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार ठोकत ६९ धावा केल्या. सूर्यकुमार यादव २३, हार्दिक पंड्या१८, किरोन पोलार्ड १० तर कृणाल पंड्या ९ धावांचे योगदान दिले.
हैदराबादच्या गोलंदाजांनी टिचून मारा केल्याने मुंबईला मोठी धावसंख्या करता आली नाही. हैदराबादकडून खलील अहमदने ४२ धावात ३ गडी बाद केले. तर मोहम्मद नबी आणि भुवनेश्वरकुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. राशिद खान आणि बासिल थ्मपी याचे खाते रिकामे राहिले.