मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तान विरुध्दच्या दिवस-रात्र कसोटीत नाबाद ३३५ धावांची खेळी केली. त्याला कसोटी इतिहासातील वैयक्तिक ४०० धावांच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. या खेळीनंतर वॉर्नरने कसोटीत सर्वोच्च धावसंख्या नोंदवलेले वेस्ट इंडीजचे महान फलंदाज ब्रायन लाराची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्याने आपल्याला ४०० पार करण्यासाठी आणखी संधी नक्की मिळणार, असे भाकित वर्तवले.
डेव्हिड वॉर्नरने ब्रायन लारा सोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याला त्याने, महान फलंदाजाला भेटणे माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. भविष्यात कदाचित मला नक्कीच त्यांनी नोंदवलेला ४०० धावांचा विक्रम मोडण्याची संधी मिळेल, असे कॅप्शन त्या फोटोला दिले आहे.
दरम्यान, ब्रायन लाराने २००४ मध्ये कसोटीत व्यक्तिगत नाबाद ४०० धावांची 'मॅजिकल' खेळी केली होती. ही खेळी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या असलेली खेळी आहे. यापूर्वी कसोटीत सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान लाराच्या नावेच होता. त्याने १९९४ मध्ये इंग्लंड विरुध्द ३७५ धावा केल्या होत्या. हा विक्रम त्याने २००४ मध्ये मोडीत काढत नाबाद ४०० धावांची खेळी केली.
दरम्यान, ब्रायन लाराने डेव्हिड वॉर्नर ४०० धावांचा रेकॉर्ड मोडीत काढू शकतो, असे भाकित वर्तवले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली. पाकविरुध्दच्या मालिकेत डेव्हिड वॉर्नरने चांगला खेळ करत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला आहे.
हेही वाचा - पाकचा रझाक म्हणतो, 'बुमराह 'बच्चा', त्यांची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती'
हेही वाचा - पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा..! रोहितचा केदारला मजेशीर सल्ला