इंदूर - बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीचा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला असला तरी दुसरा दिवस फलंदाज मयांक अग्रवालने आपल्या नावावर केला. दुसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मयांकने ३३० चेंडूंत २८ चौकार आणि ८ षटकारांसह २४३ धावांची द्विशकी खेळी केली. मयांक त्रिशतकाकडे कूच करत असताना मेहदी हसनने त्याला बाद केले. या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढत मयांकने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा मोठा विक्रम मोडित काढला.
हेही वाचा - 30 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या भात्यात दाखल झालेले 'हे' दोन अस्त्र...
मयांकने सर डॉन ब्रॅडमन यांचा कमी डावांत द्विशतकाचा विक्रम मोडला. कसोटीत सर्वात जलद दोन द्विशतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये मयांकने दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने १२ डावांत दोन द्विशतके करण्याची किमया केली. ब्रॅडमन यांना दोन द्विशतके करण्यासाठी १३ डाव खेळावे लागले होते. या विक्रमामध्ये भारताचा विनोद कांबळी अव्वल स्थान टिकवून आहे. त्याने अवघ्या ५ डावांमध्ये दोन द्विशतके पूर्ण केली होती.
शिवाय, या सामन्यात मयांकने षटकार खेचत आपले द्विशतक पूर्ण केले. २००८ मध्ये भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने षटकार खेचत आपले द्विशतक पूर्ण केले होते.