मुंबई - ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. हेडन म्हणाला, कोहलीबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ९५ चेंडूत १२३ धावांची खेळी केली होती. कोहलीच्या शतकानंतरही भारताचा ३२ धावांनी पराभव झाला होता.
हेडन विराटबद्दल म्हणाला, शतक झळकावण्याची विराटची क्षमता चकीत करणारी आहे. ज्याप्रकारे विराट धावा बनवतो, ते सर्व अविश्वसनीय आहे. विराटने त्याच्या प्रदर्शनाद्वारे सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. मी काही शानदार खेळाडूंचा विचार करत आहे. माझ्या वेळेला ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली आघाडीवर होते. परंतु, विराटने फलंदाजी एकदम सोपी बनवली आहे. तो सलग शतक झळकावत आहे. आणि त्याची प्रत्येक खेळी ही वैशिष्ट्यपूर्ण असते.
रांचीच्या खेळपट्टीवर विराटने शानदार खेळ केला. विराटने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. सर्वांना माहित आहे विराटला मिड-विकेटकडे खेळणे आवडते. परंतु, फिरकीपटूंवर दबाव आणण्यासाठी विराटने काही कट शॉट खेळले. विराटची ही खेळी असाधारण होती. याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही.