मुंबई - क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उद्या (२४ एप्रिल) रोजी ४६ वा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून तेंडुलकरचे कट्टर चाहते असलेल्या सतीश कांबळी, अभिषेक साटम आणि चेतन राऊत व सर्वांच्या टीमने सचिनला त्याच्या ४६व्या वाढदिवशी दरवर्षीप्रमाणेच रांगोळीची एक अनोखी भेट दिली. या वर्षीची रांगोळी विशेष आणि आगळीवेगळी असून ती विणकामाच्या साहित्यातून बनवण्यात आली आहे. ही रांगोळी ४४ फूट लांब आणि २४ फूट रुंदी असून बटन व पिन्सपासून बनवलेली आहे. 'बिगेस्ट रांगोळी ऑन मास्टर ब्लास्टर' या नावे त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद होणार आहे.
सचिनच्या ४६व्या वाढदिवसानिमित्त चित्रकार अभिषेकने नवीन काही तरी करण्याचा उद्देशाने चेतन राऊत व सतीश कांबळी यांनी बटन आणि पिन या विणकामच्या वस्तूंपासूनच यावर्षी कलाकृती सादर केलीय. त्यांचा टीमने नवी मुंबईतील सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये येथे सचिनच्या कारकिर्दीला मानवंदना देणारी रांगोळी रेखाटली आहे.
दरवर्षी सचिनला वाढदिवसानिमित्त एखादी वेगळी भेट देण्याचा अभिषेकचा प्रयत्न असतो. डिझायनर उमंग मेहता यांचा कल्पनेतून विणकामच्या साहित्यातून यावर्षी कलाकृती बनव असे सुचवले त्यामुळेच अभिषेक व इतर टीमने एकत्र येत विणकामाच्या साहित्याचा माध्यमातून आगळीवेगळी रांगोळीची कलाकृती सादर केली आहे. सचिन तेंडुलकरचे भव्य पोट्रेट, त्याच्या कारकीर्दीतले महत्त्वाचे क्षण, हास्यचेहरा व हॅपी बिर्थडे मास्टर ब्लास्टर या गोष्टींचा समावेश या रांगोळीत करण्यात आला आहे. ही बातमी सचिनपर्यंतही पोहोचवली जाणार आहे. सचिन ही दरवर्षी प्रमाणे त्याच्या सोशल माध्यमांवर त्याची दखलही घेईल असा या कलाकृती सादर करणाऱ्या टीमला विश्वास आहे.
सचिनच्या या अनोख्या रांगोळीची दखल मोठ्या स्तरावर घेतली जावी या उद्देशाने अभिषेकने व संपूर्ण टीमने गिनीज बुक 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्', 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'साठी अर्ज केले आहेत. त्यापैकी गिनीज बुकमध्ये त्याचं नाव नोंद होईल अशी त्यांना खात्री आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून चाहते मित्र कुटुंब वेगवेगळ्या प्रकारे मानवंदना देत असतात. त्यामध्येच सतीश, अभिषेक, चेतन आणि त्यांच्या टीमने ही वेगळी कलाकृती सादर करून सचिनला सर्वात मोठी मानवंदना दिल्याचे म्हटले जातेय. तसेच अभिषेककडे सचिनचे ४० हजारांहून अधिक फोटो, अनेक मासिके, पुस्तके, सोन्याचा मुलामा असलेली आणि सचिनचा ऑटोग्राफ असलेली बॅट, यांसारख्या अनेक गोष्टींचा खजिना आहे. त्या अनमोल गोष्टीही या रांगोळीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतील.