ढाका - बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार मशरफी मुर्तझाने राष्ट्रीय संघासोबतचा करार रद्द केला आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुर्तझाने सोमवारी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. 'कालपर्यंत मी मध्यवर्ती कराराचा भाग होतो पण आता नाही', असे मुर्तझा म्हणाला.
हेही वाचा -IND VS AUS : भारताचा डाव २५५ धावांवर आटोपला, स्टार्कचे तीन बळी
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसन यांनी पत्रकारांना सांगितले की, 'मुर्तझाला यापुढे करारबद्ध खेळाडू म्हणून करार सुरू ठेवण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्याचा प्रस्ताव आम्ही मान्य केला आहे.' परंतू अजूनही बराच काळ खेळत राहू इच्छितो, असे बांगलादेशकडून २१७ एकदिवसीय सामने खेळलेल्या मुर्तझाने म्हटले होते.
'माझा नेहमीच विश्वास आहे की बीसीबी हे क्रिकेटपटूंचे पालक आहेत. मला निरोपाच्या पार्टीमध्ये रस नाही', असे मुर्तझाने म्हटले. ३६ वर्षीय मुर्तझाने बांगलादेशकडून ३६ कसोटी आणि ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
त्याने ३६ कसोटी सामन्यात ७९७ धावा केल्या आहेत आणि ७८ बळी घेतले आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्याने १७८६ धावा आणि २६६ बळी मिळवले आहेत. तसेच, त्याने आत्तापर्यंत ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने ३७७ धावा आणि ४२ बळी घेतले आहेत.