नवी दिल्ली - वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू मार्लन सॅम्युएल्सने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांनी एका संकेतस्थळाला ही माहिती दिली.
जॉनी ग्रेव्ह म्हणाले, की सॅम्युएल्सने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला जून महिन्यातच याची माहिती दिली होती. त्याने डिसेंबर २०१८मध्ये वेस्ट इंडिजसाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ३९ वर्षीय मार्लन सॅम्युएल्सने वेस्ट इंडीजसाठी महत्त्वाचे सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे २०१२ आणि २०१६ च्या टी-२० वर्ल्डकप जिंकणार्या संघात त्याचे सर्वात मोठे योगदान होते.
दोन वर्ल्डकपचा नायक -
२०१२च्या टी-२० वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध ५६ चेंडूत ७८ धावा केल्या, तर २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ६६ चेंडूत नाबाद ८५ धावा कुटल्या होत्या. दोन्ही अंतिम सामन्यात त्याच्या अविस्मरणीय खेळीसाठी त्याला 'सामनावीर' पुरस्कारही मिळाला.
कारकीर्द -
मार्लन सॅम्युएल्सने विंडीजसाठी ७१ कसोटी , २०७ एकदिवसीय आणि ६७ टी-२० सामने खेळले. या त्याने अनुक्रमे ३९१७, ५६०६, १६११ धावा केल्या आहेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने एकूण १७ शतके ठोकली असून गोलंदाजीत १५२ बळी मिळवले आहेत.