मुंबई- भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनी याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महेंद्र सिंह धोनीने इंन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीच्या कारकिर्दितील छायाचित्रे आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'कभी कभी' या चित्रपटातील 'मैं पल दो पल का शायर हूं...' हे गायक मुकेश यांच्या आवाजातील गीत ऐकायला मिळते. हा व्हिडिओ 4 मिनिट आणि 7 सेकंदाचा आहे. याद्वारे महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दितील आठवणींना उजाळा दिला आहे.
- View this post on Instagram
Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired
">
महेंद्र सिंह धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दितील अनेक छायाचित्र पाहायला मिळतात. व्हिडिओच्या सुरुवातीला धोनीच्या कारकिर्दिच्या प्रारंभीचे फोटो पाहायला मिळतात. 2011 विश्वकरंडक स्पर्धेतील बरेच फोटो या व्हिडिओत आहेत. शनिवारी सायंकाळी 07:29 पासून आपल्याला निवृत्त समजण्यात यावे, असे धोनीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. धोनीने २०२१ च्या वर्ल्डकपच्या आधीच निवृत्ती घेतल्याने तो विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार की नाही याला पूर्णविराम मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या तुफानी खेळीने व विशेषत: हेलिकॉप्टर शॉटने क्रिकेट रसिकांच्या मनावर गारुड निर्माण केले होते.
विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'प्रत्येक खेळाडूचा क्रिकेटचा प्रवास एक दिवस संपत असतो. मात्र, जेव्हा तुमच्या जवळचा कोणी निवृत्ती जाहीर करतो, तेव्हा तुम्ही जास्त भावनिक होता. तु देशासाठी जे काही केले आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात कायमच राहील. मात्र, तुझ्याकडून मिळालेला आदर आणि प्रेम निरंतर माझ्यामध्ये राहील. जगाने तुझे यश पाहिले आहे. मात्र, मी तुझ्यातील माणसाला पाहिले आहे, असे म्हणत कोहलीने धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.