मुंबई - पुण्यासह महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे काही जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय मालिकेवर अनिश्चिततचे सावट होते. पण या मालिकेला ठाकरे सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात खेळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. महाराष्ट्रातील सध्याची कोविड-19 संसर्गाची परिस्थिति पाहता, सर्व सामने विना प्रेक्षक खेळवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. त्यामुळं आता उभय संघातील मालिका पुण्यात होणार हे निश्चित झालं आहे.
पुण्यात होणारे हे तीनही सामने विनाप्रेक्षक खेळवले जातील. दरम्यान, कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सशर्त परवानगी दिल्यानंतर उभय संघातील मालिकेवरचे अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आता ही मालिका महाराष्ट्रात खेळवू शकते. त्यासाठी आता पुढील आवश्यक त्या सर्व परवानगीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे, असे सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा - Vijay Hazare Trophy : मुंबईचा विजयी चौकार, श्रेयस अय्यरचे शतक
हेही वाचा - 'भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात... आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला', सचिनचे 'माय मराठी'बद्दल ट्विट