दिल्ली - रणजी स्पर्धेची चौथी फेरी आज ३ जानेवारीपासून सुरु झाली. या फेरीतील महाराष्ट्र विरूद्ध सर्विसेस हा सामना दिल्लीत खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात महाराष्ट्राचा संघ अवघ्या ४४ धावांत गारद झाला असून रणजी ट्रॉफीत लाजीरवाण्या कामगिरीची महाराष्ट्राने नोंद केली आहे.
हेही वाचा - तब्बल २२ वर्षानंतर ठाण्यात रंगणार रणजी सामना!
पहिल्या डावात फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्याच षटकात मुर्तझा ट्रंकवाला शून्यावर बाद झाला. त्याच्या पाठोपाठच्या षटकात नवशाद शेख (०) आणि ऋतुराज गायकवाड (४) बाद झाले. संघाकडून राहुल त्रिपाठीने थोडा प्रतिकार केला. त्रिपाठी ३९ चेंडूत ६ धावा करुन बाद झाला.
महाराष्ट्र संघाकडून केवळ सत्यजीत बछाव आणि चिराग खूराना यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. बछावने ११ आणि चिरागने १४ धावा केल्या. सर्विसेस संघाकडून पुनम पुनियाने ११ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. सच्चिदानंद पांडेने ३ आणि दिवेश पठाणियाने २ बळी घेतले आहेत.