कोलकाता - बांगलादेश विरुध्दच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघ डावाने विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. या गोलंदाजीपुढे दुसऱ्या दिवसा अखेरीस बांगलादेशने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारतीय वेगवान माऱ्यासमोर पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही बांगलादेशी फलंदाजांची तारांबळ उडाली. मात्र मधल्या फळीत मुश्फिकुर रहिम आणि मेहमद्दुला यांनी भागीदारी करत भारताचा विजय लांबवला. दुसऱ्या डावात इशांत शर्मा आणि उमेश यादव या जोडीने बांगलादेशच्या फलंदाजांची पळता भूई केली.
बांगलादेशचा संघ अजुनही ८९ धावांनी पिछाडीवर असून भारताला डावाने विजय मिळवण्यासाठी ४ बळींची आवश्यकता आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागू शकतो. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद ३४७ वर घोषित केला. यामुळे भारताला पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळाली.
कर्णधार विराट कोहलीने १३६ धावांची खेळी करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्याला चेतेश्वर पुजारा आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने चांगली साथ दिली. पुजाराने ५५ तर रहाणेने ५१ धावा केल्या. पहिल्या सत्रापर्यंत भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र उपहाराच्या सत्रानंतर विराट कोहली माघारी परतला आणि भारतीय डावाला गळती लागली. तेव्हा विराटने ३४७ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
बांगलादेशकडून इबादत हुसेनने सर्वाधिक ३, तर अल-अमिन हुसेन आणि अबु जायेद यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तैजुल इस्लामने एका गड्याला माघारी धाडलं.