लंडन - वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी क्रिकेटपटू मायकेल होल्डिंग यांनी आपल्या कुटुंबातील वर्णद्वेषाचा अनुभव सांगितला आहे. हा अनुभव साांगताना होल्डिंग यांना रडू कोसळले. ''माझ्या आईने कृष्णवर्णीय व्यक्तीशी लग्न केले, म्हणून माझ्या आईच्या कुटुंबाने माझ्या आईशी बोलणे बंद केले होते'', असे ते म्हणाले.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवसाखेर झालेल्या मुलाखतीत होल्डिंग भावूक झाले. ते म्हणाले, "खरे सांगायचे तर जेव्हा मी माझ्या पालकांबद्दल विचार करतो, तेव्हा ही गोष्ट मला भावनिक करते. आता ही गोष्ट परत येत आहे. मला माहित आहे की माझ्या पालकांनी कोणत्या परिस्थितीत सामना केला आहे. माझ्या आईने कृष्णवर्णीय व्यक्तीशी लग्न केले, म्हणून माझ्या आईच्या कुटुंबाने माझ्या आईशी बोलणे बंद केले होते.''
होल्डिंग पुढे म्हणाले, "बदल अगदी हळू होईल, परंतु हे बदल फारच मंद गतीने होत आहेत. मला आशा आहे की गोष्टी योग्य दिशेने जातील. वेग कितीही असो. मला काही फरक पडत नाही."
अमेरिकन कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लाईडच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. या घटनेनंतर जगभरात 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर' चळवळीने जोर धरला आहे.