लंडन - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी माझा आदर्श असून आयपीएल दरम्यान त्याला पाहून बरेच काही शिकलो, असे मत इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने दिले आहे. लँकेशायर क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत बटलरने आपली प्रतिक्रिया दिली.
कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याच्या धोनीच्या पद्धतीवरून शिकायला मिळते, असेही बटलरने सांगितले. ''धोनी नेहमीच माझा आदर्श राहिला आहे. त्याच्या आजूबाजूला नेहमीच गर्दी असते. लोकांना त्याला नेहमी पाहायचे असते. त्याला पाहणे माझ्यासाठी खूप मोठे शिक्षण आहे. वरच्या स्तरावर कठीण परिस्थितीत कसे चांगले काम करावे हे त्याच्याकडून शिकता आले. ही नक्कीच सर्वात मोठी गोष्ट आहे", असे बटलर म्हणाला. बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तथापि, कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.
बटलर पुढे म्हणाला, "भारतात आपल्याला एक प्रकारचा दबाव सहन करावा लागतो. परदेशी खेळाडू म्हणून तुम्ही खेळणार्या चार खेळाडूंपैकी एक आहात. तुम्हाला माहित आहे की बाहेर बसलेले चार विदेशी खेळाडू देखील जागतिक दर्जाचे आहेत. म्हणून आपल्यावर कामगिरीचा दबाव आहे. त्यामुळे या दबावातून बाहेर कसे पडावे हे मी आयपीएलमधून शिकलो आहे."