कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याची माजी गर्लफ्रेंड हमीजा मुख्तारने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. आता लाहोरच्या न्यायालयाने पोलिसांना बाबरच्या घटनेबाबत एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या तक्रारीनुसार बाबरने हमीजावर लैंगिक अत्याचार केले, तिला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वासघात केला.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नोमन मोहम्मद नईम यांनी नासिराबाद पोलिस स्टेशनच्या एसएचओला बाबरविरोधात गुन्हा दाखल करण्यास आणि दोन्ही पक्षांच्या वकिलांनी पुढे येऊन आपले मत मांडण्यास सांगितले आहे. पुरावा म्हणून पीडितेने वैद्यकीय कागदपत्रे सादर केली आहेत. हे आरोप गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असे न्यायाधीशांचे म्हणणे आहे.
नसीराबाद पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आबिद रझा यांनी बाबरने यापुढे हमीजाला त्रास देऊ नये, असा आदेश दिला होता. हमीजाच्या सांगण्यानुसार, तिला खटला मागे घेणयासंबधी फोन कॉल्स येत आहेत.
बाबर नुकताच न्यूझीलंडच्या दौर्यावर गेला होता. तिथे त्याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे बाबरला एकही सामना खेळता आला नाही. पाकिस्तानच्या संघाने टी -२० मालिका १-२ अशी गमावली, तर कसोटी मालिकेत त्यांना ०२ असा व्हाईटवॉश मिळाला. बाबर सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करत आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू लायनचा 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मान