अबुधाबी - दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने ५९ धावांनी विजय मिळवला. विजयानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आपल्या संघातील खेळाडूंचे कौतूक केले.
सामना संपल्यानंतर मॉर्गन म्हणाला, मागील सामन्यात पराभव झाल्यानंतर आम्हाला विचार करण्यासाठी वेळ मिळाला. यामुळेच आम्हाला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला. सुनिल नरेनने शानदार वापसी केली. त्याने अष्टपैलू खेळ केला. तसेच नितीश राणाने महत्वपूर्ण खेळी केली.
नरेनला वरच्या फळीत फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय प्रशिक्षकांचा होता. स्पर्धेत मजबूत फलंदाजी क्रम राखणे गरजेचे आहे. यामुळे मी खालच्या फळीत फलंदाजीला आलो, असेही मॉर्गनने सांगितले.
वरूण चक्रवर्तीने दिल्लीचे ५ गडी बाद करत कोलकाताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यावर मॉर्गन म्हणाला, वरूण एक चांगला माणूस आहे. तो आपले काम व्यवस्थित पार पाडतो. संपूर्ण स्पर्धेत तो चांगली कामगिरी करत आहे.
दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी नोंदवली. नरेन (६४) आणि नितीश राणा (८१) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या ११५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने दिल्लीपुढे १९५ धावांचे मजूबत आव्हान ठेवले. यानंतर वरूण चक्रवर्ती आणि पॅट कमिन्ससह कोलकाताच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. दिल्लीचा संघ १३५ धावापर्यंतच मजल मारू शकला आणि कोलकाता हा सामना एकतर्फी जिंकला.
हेही वाचा - अर्धशतकानंतर राणानं दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी...जाणून घ्या कारण
हेही वाचा - KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम