दुबई - वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू आंद्रे रसेल हा आयपीएलमध्ये घातक फलंदाजीसाठी ओळखला जातो. इतर लीगप्रमाणेच तो आयपीएलमध्येही धावांची बरसात करण्यास चुकत नाही. याच रसेलविषयी कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि मराठमोळा मुंबईकर सिद्धेश लाडने प्रतिक्रिया दिली आहे. कोलकाताचा खेळाडू असलेल्या रसेलविरूद्ध नेटमध्येही गोलंदाजी करायची नसल्याचे सिद्धेशने सांगितले.
यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेला सिद्धेश यंदा कोलकाताकडून खेळणार आहे. तो म्हणाला, ''नेटमध्ये रसेलला गोलंदाजी करण्यापेक्षा मी फलंदाज म्हणून बुमराहचा सामना करेन. मी स्थानिक क्रिकेटमध्ये सरावादरम्यान बुमराहविरूद्ध खेळलो आहे. रसेल किती घातक आहे, हे मी पाहिले आहे. मी त्याला कधीही गोलंदाजी केली नाही.''
आयपीएल खेळण्याबाबत सिद्धेश म्हणाला, "भारतातील क्रिकेटचे सर्वात मोठे व्यासपीठ असलेल्या आयपीएलमध्ये खेळायला मी उत्सुक आहे. माझे घरगुती सत्र चांगलेच राहिले आहे. पण काही हंगाम आयपीएल खेळायला मिळाले, तर माझे भविष्य चांगले होईल."
आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत होणार आहे.