नवी दिल्ली - भारताने आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये खेळवण्यात आलेला सामना भारताने १ डाव १३७ धावांनी जिंकला. मागील दहा वर्षांमध्ये आफ्रिकेला कोणत्याही संघाने फॉलो-ऑन लादला नव्हता. तेव्हा विराटने फॉलोऑन लादत आफ्रिकेचा मानहानिकारक पराभव केला. या मानहानिकारक पराभवानंतर आफ्रिकेची चिंता आणखी वाढली आहे. त्यांच्या मुख्य खेळाडूने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीतून माघार घेतली आहे.
तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. या वृत्ताला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनेही दुजोरा दिला आहे. यामुळे आफ्रिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना महाराजच्या खांद्याला दुखापत झाली. एमआरआय (MRI) च्या रिपोर्टनुसार, महाराजच्या खांद्याचे स्नायू दुखावले गेले आहेत. त्यामुळे त्याला १४ ते २१ दिवसांची विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे तो पुढील सामना खेळू शकणार नाही.
केशव महाराजला मालिकेत गोलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नाही. मात्र, त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १३२ चेंडूत ७२ धावांची चिवट खेळी केली. या खेळीसह त्याने फिलँडरसह नवव्या विकेटसाठी १०९ धावांची विक्रमी भागिदारी केली. तसेच महाराजने दुसऱ्या डावात ६५ चेंडूत २२ धावा केल्या. मात्र त्याला दुखापत झाल्याने, त्याच्या जागी जॉर्ज लिंडेचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - भीषण अपघातात ४ राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू, ३ गंभीर
हेही वाचा - जागतिक कसोटी अजिंक्यपद: भारताचे अव्वलस्थान भक्कम तर पाकिस्तान तळाला