मुंबई - कोरोना लढ्यात मदतनिधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला होता. तीन सामन्यांच्या मालिकेतून उभा राहणाऱ्या निधीचे दोन्ही देशांतील कोरोना परिस्थितीशी मुकाबल्यासाठी समान वाटप केले जाईल, असा प्रस्ताव अख्तरचा होता. या प्रस्तावावर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव चांगलेच भडकलेले आहे. त्यांनी शोएबच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, भारताला सामना खेळवून मदत निधी जमा करण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे.
कपिल यांनी या विषयावर सांगितलं, की 'कोरोनाशी लढण्यासाठी भारताला पैशांची नाही. त्यामुळे अशी मालिका खेळवायला नको आणि क्रिकेटपटूंचे जीव कशाला धोक्यात घालायचा? त्यामुळे निवांत राहा आणि घरीच थांबा. प्रशासन योग्य काम करत आहे.'
१९८३ ला भारताला विश्वकरंडक जिंकून देणारे कपिल देव पुढे म्हणाले, बीसीसीआयने कोरोना लढ्यासाठी ५१ कोटी रुपयांचे दान दिले आहे. जर देशाला अजून गरज पडल्यास नक्कीच अधिक मदत केली जाईल. त्यासाठी मदतनिधी सामना खेळवून जमा करण्याची काहीच गरज नाही. सध्याच्या घडीला देशातील वातावरण चिंताजनक आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंचे जीव कशाला धोक्यात घालायचा? पुढील ६ महिने क्रिकेटची गरज नाही. कारण यात खूप मोठा धोका आहे.'
दरम्यान, अख्तरने कोरोनाचा फटका सर्वांनाच बसला आहे. या लढ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमधून मिळू शकते. तसेच या मालिकेच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले होते.
हेही वाचा - कोरोना : पाकिस्तान सरकार हतबल; अख्तरने मागितली भारताकडे मदत
हेही वाचा - विराटशी पंगा घेऊ नका, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा गोलंदाजांना सल्ला