ऑकलंड - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने कर्णधार पद सोडण्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सपाटून हार झाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाला आणि कर्णधार विल्यसनला टीकेचा सामना करावा लागला. सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व विल्यमसनकडे आहे.
'माझे कर्णधारपद सोडणे संघाच्या हितासाठी असेल तर मी केव्हाही पद सोडण्यास तयार आहे, असे विल्यमसन म्हणाला. हा वैयक्तिक हिताचा मुद्दा नाही. संघासाठी जे योग्य आहे, ते करण्यावर कायम माझा भर राहिला आहे. संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. त्यामुळे झालेल्या चुकांमधून धडा घेऊन झटपट पुढच्या आव्हानांसाठी सज्ज राहणे गरजेचे आहे, असेही विल्यमसन म्हणाला.
हेही वाचा - VIDEO : पराभवाचा वचपा काढणार का? विराटने 'हे' उत्तर देत जिंकली मनं
भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी संघाला विश्रांतीसाठी आणि सरावासाठी थोडा वेळ मिळाला. याचा निश्चितच संघाला फायदा होईल. भारताचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट संघ आहे. त्यांच्या विरुद्ध खेळणे हा नेहमीच उत्तम अनुभव असतो, असे मत कर्णधार केन विल्यमसनने व्यक्त केले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पाच टी-20, तीन वन-डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत. यातील पहिला टी-20 सामना शुक्रवारी ( 24 जानेवारी) ऑकलंड येथे होणार आहे. त्यापूर्वी केन विल्यमसनने कर्णधार पदाबाबत आपले मत व्यक्त करून न्यूझीलंड क्रिकेटमधील बदलाचे संकेत दिले आहेत.