लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये न्यूझिलंड विरुध्द वेस्ट इंडिजचा सामना रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने शतक झळकावले. महत्वाचे म्हणजे केनचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. त्याने आज वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाचा 'समाचार' घेत ही शतकी खेळी केली.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील ३० व्या सामन्यात वेस्ट इंडिज विरुध्द शतकी खेळी केली. न्यूझीलंड संघाची धावसंख्या २ बाद ६ धावा असताना केनने झुंजार खेळी खेळत संघाला चांगल्या स्थितीत आणले. या सामन्यात केनने १२३ चेंडूचा सामना करत शतक झळकावले. केनच्या कार्यकिर्दीमधील हे १३ वे शतक आहे. केनने याच स्पर्धेत दक्षिण अफ्रिकाविरुध्द नाबाद १०६ धावांची खेळी केली होती.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाने सर्वाधिक शतके बनवण्याचा विक्रम केला आहे. विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एकूण ७ शतके झळकावली आहेत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडक स्पर्धेत ६ शतके झळकावली आहेत.