मँचेस्टर - इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉटची पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
2018 मध्ये निवृत्त झालेला ट्रॉट ग्रॅहम थॉर्पची जागा घेईल. एका अहवालानुसार, न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू जीतन पटेल आणि ट्रॉटचा वॉर्विकशायरमधील माजी साथीदार ग्रॅहॅम वेल्चदेखील प्रशिक्षक कर्मचार्यांमध्ये सहभागी होईल.
ट्रॉटने 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडकडून 52 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी 3835 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 9 शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत.
घरगुती क्रिकेटमध्येही ट्रॉटची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्याने 281 सामन्यात 18,662 धावा केल्या आहेत. त्यात 46 शतके आणि 92 अर्धशतकांचा समावेश आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड मालिकेचा पहिला कसोटी सामना बुधवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे प्रारंभ होत आहे. दुसरा कसोटी सामना 13 ऑगस्टपासून साऊथम्प्टन तर, तिसरा सामना 21 ऑगस्टपासून सुरू होईल. मँचेस्टर येथे 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तीन टी-20 सामने खेळले जातील.