चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या (ता. ५) पासून सुरूवात होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने, इंग्लंड संघासाठी भारतीय संघातील कोणत्या खेळाडूची विकेट महत्वाची आहे, हे सांगितले आहे.
इंग्लंड संघासाठी विराट कोहलीची विकेट महत्वाची आहे, असे जो रुटने सांगितले असेल, असा अनेकांचा कयास असेल. पण असे नाही तर रुटने, चेतेश्वर पुजाराची विकेट आमच्यासाठी महत्वाची आहे, असे सांगितले आहे.
रूट म्हणाला की, 'पुजारा एक उत्तम फलंदाज आहे. त्याच्यासोबत मी यार्कशरमध्ये दोन सामने खेळली आहेत. त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. फलंदाजीविषयी चर्चा करणे आणि क्रिकेटप्रती त्याचे असलेले प्रेम हे वास्तविक रंजक आहे. सुरू होणाऱ्या मालिकेत त्याची विकेट आमच्या संघासाठी महत्वपूर्ण आहे.'
दरम्यान, पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा मारा थोपवून धरत एक बाजू लावून धरली. त्यामुळे दुसऱ्या बाजूने फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करता आली. परिणामी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला.
पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या नावे ८१ कसोटी सामन्यात ६१११ धावा आहेत.
हेही वाचा - बांग्लादेशचा न्यूझीलंड दौरा एक आठवड्यासाठी स्थगित, जाणून घ्या कारण
हेही वाचा - Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर