चेन्नई - इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या गोलंदाजीवर, पुढे येऊन षटकार ठोकत द्विशतक पूर्ण केले. रुटचे हे कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. या द्विशतकासह रुट, कसोटीत सर्वाधिक द्विशतके झळकावणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तीक दुसऱ्यास्थानी पोहोचला आहे. अॅलेस्टर कुकच्या नावे ५ द्विशतके आहेत. तर वेली हामंड यांच्या नावे ७ द्विशतके आहेत. याशिवाय रुटच्या नावे आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. तो १०० व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
रुटने सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावले. त्याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. तो १०० व्या कसोटीत शतक झळकावणारा नववा फलंदाज ठरला आहे. रुटच्या आधी कॉलिन कौड्रे, जावेद मियाँदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंजमाम-उल-हक, रिकी पॉटिंग, ग्रीम स्मिथ आणि हाशिम आमला यांनी त्यांच्या १००व्या कसोटीत शतक झळकावले आहे.
रूटचा भीमपराक्रम -
रूटसोबत फलंदाजीला आलेल्या स्टोक्सने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. फिरकीपटू शाहबाझ नदीमने त्याला पुजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप रूटसोबत स्थिरावला. जो रुटने भारताविरुद्ध १४३ व्या षटकात आर अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. कारकिर्दीतील १००व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रुट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला असा पराक्रम करता आलेला नाही.
पहिले सत्र -
आज पहिल्या सत्रात इंग्लंडने एकूण ९२ धावा केल्या. या सत्रात भारतीय खेळाडूंनी बर्याच संधी गमावल्या. बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी आलेल्या तीन संधी भारताने गमावल्या. याचा पुरेपूर फायदा घेत स्टोक्सने शानदार अर्धशतक झळकावले.
पहिला दिवशी पाहुण्यांचा बोलबाला -
या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लेने फलंदाजीची सुरुवात केली. दुसऱ्या षटकात बर्न्सला जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडून जीवदान मिळाले. पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना यश मिळाले नाही. या दोन्ही सलामीवीरांनी २० षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पाही पार करून दिला. त्यानंतर फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने बर्न्सला बाद केले. बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनिएल लॉरेन्सला जसप्रीत बुमराहने पायचित पकडले. लॉरेन्स शुन्यावर बाद झाला.