दुबई - आयसीसीने आज जाहीर केलेल्या महिला क्रिकेटपटूंच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. महिला क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मंधानाने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. तर महिलांच्या गोलंदाजी क्रमवारीत वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने पहिल्यास्थानी झेप घेतली आहे.
तब्बल सात वर्षानंतर एकाच वेळी भारतीय महिला फलंदाज आणि गोलंदाज यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी २०१२ मध्ये फलंदाज मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी हा कारनामा केला होता. स्मृती ७९७ तर झुलन ७३० गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झूलन गोस्वामी आणि स्मृती मंधानाने केलेल्या शानदार कामगिरीचा फयदा त्यांना आयसीसीच्या क्रमवारीत झाला. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या शानदार खेळीमुळे भारताने इंग्लंड विरुद्धची ३ वनडे सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.