कराची - यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून पाकिस्तान संघाला उपांत्य फेरी अगोदरच बाहेर पडावे लागले. शिवाय, टीम इंडियाकडून त्यांना परत एकदा पराभव स्विकारावा लागल्याने चाहत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. या कामगिरीचे मूल्यमापन म्हणून पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात यावा, अशा चर्चाही जोर धरू लागल्या. आता या विषयाला पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने हात घातला आहे. त्याने पाक संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एक नाव सूचवले आहे.
मियांदादच्या मते, पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम हा संघाच्या प्रशिक्षकपदासाठी योग्य ठरू शकतो. त्याने अक्रमची स्तुती करताना त्याला प्रतिभावान खेळाडू म्हटले आहे. 'जगात अनेक खेळाडू अक्रमच्या हाताखाली तयार होत आहेत. त्याने दिलेल्या योगदामुळे अनेकांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. जर इतर खेळाडू आणि देश अक्रम चा फायदा करून घेत आहेत तर आपण का घेत नाही ?' असा सवाल मियांदाद यांनी दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
मियांदाद पुढे म्हणाले, 'आपल्याकडे अक्रमसारखा खेळाडू असताना परदेशी प्रशिक्षकांना का नेमायचे? एखाद्या स्पर्धेत चांगले खेळलो तर, प्रशिक्षक सर्व श्रेय घेतो आणि खेळाडू अपयशी ठरले, तर खापर खेळाडूंच्या माथी फोडले जाते.'
1998-99 मध्ये वसीम अक्रम संघाचे नेतृत्व करत असताना जावेद मियांदाद यांनी स्वतः पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.