लंडन - इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज जेसन रॉय रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुखापतीमुळे जेसन रॉयला विश्वकरंडक स्पर्धेत मागच्या ३ सामन्यांना मुकावे लागले आहे. विश्वकरंडकात रॉयने आतापर्यंत तीन सामने खेळताना 215 धावा केल्या आहेत. यात बांगलादेशविरुद्ध केलेल्या 153 धावांच्या दमदार दीडशतकी खेळीचा समावेश आहे.
वेस्टइंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे जेसन वेस्टइंडीज विरुद्ध सलामीसाठीही आला नव्हता. त्याच्या जागी जो रूटने इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली होती. इंग्लंडला पुढचा सामना रविवारी बलाढ्य भारताविरुद्ध 30 जूनला खेळायचा आहे.
यजमान इंग्लंडच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताविरुद्ध विजय संपादन करावाच लागणार आहे.