मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिमाखदार विजय नोंदवला. सामन्याच्या पाचव्या दिवशी विंडीजच्या संघाकडून कर्णधार जेसन होल्डरने प्रतिकार केला खरा, पण तो कमी पडला. ब्रूक्स आणि ब्लॅकवूड यांच्या अर्धशतकानंतरही वेस्ट इंडिजला सामन्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
आता निर्णायक आणि तिसऱ्या कसोटीत कोण विजय मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात होल्डर म्हणाला, "निकालामुळे आम्ही निराश झालो आहोत. आम्ही स्वत:लाच निराश केले आहे. इंग्लंडने चांगले क्रिकेट खेळले. त्यामुळे विजयाचे श्रेय त्यांना जाते."
तो पुढे म्हणाला, "आम्ही सामना लांबवू शकत नाही. पण आम्ही निराश झालो आणि सतत विकेट गमावत राहिलो. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. त्यांनी चाांगली गोलंदाजी केली. फलंदाज क्रीजमध्ये अडकले. चेंडू खेळायचा की नाही, हे ठरवावे लागेल. या गोष्टींचा विचार करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ही एक छोटी समस्या आहे.''
"आम्ही येथे लढण्यासाठी आलो आहोत. मला माहित आहे की आमच्या संघातील खेळाडूंच्या मनात मात खाल्याची भावना निर्माण झाली आहे. पण, शेवटच्या सामन्यात आम्ही सर्व काही पणाला लावू", असेही होल्डर म्हणाला.