गाले - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने चमकदार कामगिरी केली. अँडरसनने लंकेचा फलंदाज निरोशन डिकवेलाला तंबूत पाठवत आपल्या बळींचे 'पंचक' पूर्ण केले. यासह अँडरसनच्या खात्यात आता कसोटीत ३० वेळा पाच बळी घेण्याच्या कामगिरीची नोंद झाली आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा महान माजी गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राने कसोटीत २९ वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे.
अँजेलो मॅथ्यूजचा शतकाच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडसमोर पहिल्या डावात ३८१ धावांपर्यंत मजल मारली. या डावात ३८ वर्षीय अँडरसनने अवघ्या ४० धावांत ६ बळी घेतले. लंकेचा फलंदाज सुरंगा लकमलला बाद करत अँडरसनने आपल्या सहाव्या बळीची नोंद केली. अँडरसनच्या खात्यात आता एकूण ६०६ कसोटी बळी आहेत. सर्वाधिक कसोटी बळींच्या विक्रमात तो चौथ्या स्थानी आहे. तिसरे स्थान गाठण्यासाठी त्याला अजून १४ बळींची आवश्यकता आहे. भारताचा महान माजी फिरकीपटू अनिल कुंबळे या विक्रमात तिसऱ्या स्थानी आहे.
सर्वाधिक पाच बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसनने सहावे स्थान मिळवले आहे. एकूण गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड हॅडली यांनी सर्वाधिक ३६ वेळा कसोटीत पाच बळी घेण्याची कामगिरी नोंदवली आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चेन्नईतील कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना डावलले