जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मध्ये हॅट्ट्रीक नोंदवणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅस्टन अगरने भारताच्या रवींद्र जडेजाची प्रशंसा केली आहे. 'जडेजा रॉकस्टार आहे, मला त्याच्यासारखं क्रिकेट खेळायचंय', अशी प्रतिक्रिया अगरने दिली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अगरने आपल्या संघाला १०७ धावांनी जबरदस्त विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. या सामन्यात त्याने पाच बळी टिपले.
हेही वाचा - VIDEO : सर डॉन ब्रॅडमन यांचा रंगीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
'भारताविरूद्धच्या मालिकेनंतर जडेजा बरोबर माझा चांगला संवाद झाला. तो माझा आवडता खेळाडू आहे. मलाही त्याच्याप्रमाणेच क्रिकेट खेळायचे आहे. तो एक पूर्ण रॉकस्टार आहे. मोठे फटके खेळणे, कुशलतेने क्षेत्ररक्षण करणे, चेंडूला उत्कृष्ट फिरकी देणे. त्याला पाहण्यामुळे आत्मविश्वास मिळतो. मी त्यांच्याशी फिरकी गोलंदाजीबद्दल बोललो. तो फलंदाजी करतो तेव्हा त्याची मानसिकता सकारात्मक असते. याच मानसिकतेचा उपयोग तो क्षेत्ररक्षणादरम्यान करतो', असे अगरने म्हटले आहे.
अगरने चार षटकांत २४ धावा देऊन पाच बळी घेतले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची ही टी-२० मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाने हॅट्ट्रीक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. २६ वर्षीय अॅश्टनने आपल्या गोलंदाजीवर आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिस, अॅन्डिले फेल्लुक्वायो आणि डेल स्टेन यांना लागोपाठ बाद करत हॅट्ट्रीक नोंदवली. त्याआधी जेम्स फॉकनरने २०१६ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध २४ धावा देऊन पाच बळी घेतले होते.