मुंबई - न्यूझीलंडविरूद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे आता भारतीय संघासमोर कसोटी मालिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेसाठी महत्त्वाचा खेळाडू संघात दाखल झाल्यामुळे टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - १० वर्षाच्या मुलाने केलेला गोल पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही...पाहा व्हिडिओ
भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. तो आता २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंड येथे होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तो भारतीय संघात सामील होणार आहे. विदर्भविरुद्ध सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेच्या सामन्यात इशांतला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे दुखापतीतून सावरण्यासाठी इशांतला सहा आठवड्यांकरिता पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
'एनसीएमध्ये गेल्यानंतर, पुढील परिस्थिती काय असेल हे नंतर कळेल', असे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक संजय भारद्वाज यांनी म्हटले होते. न्यूझीलंडमध्ये भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेची पहिली कसोटी २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. तर दुसरा सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान खेळवला जाईल.