किंग्स्टन - वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यश संपादन करण्यासाठी टीम इंडिया आज सज्ज झाली आहे. या दोन्ही संघातील शेवटचा कसोटी सामना आज सबीना पार्क येथ रंगणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडिया कशी खेळते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराटला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. हा सामना कोहलीने जिंकला तर तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनू शकतो. शिवाय, एक शतक करत तो पाँटिंग आणि स्मिथ यांना पिछाडीवर टाकू शकतो. पाँटिंग आणि कोहलीने कर्णधार म्हणून १९ कसोटी शतके ठोकली आहेत.
तर, दुसरीकडे वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही एक विक्रम खुणावतो आहे. या सामन्यात जर इशांतने एक किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल. हा विक्रम जर त्याने नोंदवला तर तो कपिल देव यांना मागे टाकेल.
![ishant sharma is eying to break kapil dev record of taking highest wickets outside asia](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/d96drc6xoaeylbw_3008newsroom_1567166886_617.jpg)
आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. त्याने २०० विकेट्स आशिया खंडाबाहेर घेतल्या आहेत.
आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज -
- २०० - अनिल कुंबळे (५० सामने)
- १५५ - कपिल देव (४५ सामने)
- १५५ - इशांत शर्मा (४५सामने)
- १४७ - झहिर खान (३८ सामने)
- १२३ - बिशनसिंग बेदी (३४ सामने)
- ११७ - हरभजन सिंग (३२ सामने)
- ११७ - जवागल श्रीनाथ (३१ सामने)