मुंबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशनने चांगली कामगिरी करत, सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या मते, किशन हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला आहे. तो एकदिवसीय आणि टी-२० संघात धोनीची जागा घेऊ शकतो, असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले प्रसाद...
किशनसाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला गेला आहे. सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर आणि जिथे गरज असेल तिकडे सलामीला येऊनही त्याने आपल्यातले गुण सिद्ध केले आहेत. संघाला गरज असेल त्याप्रमाणे आपल्या फलंदाजीत बदल करुन खेळ करण्याचे त्याचे कौशल्य वाखणण्याजोगे आहे. त्यामुळे भारतीय संघात टी-२० आणि एकदिवसीय संघात त्याला धोनीच्या जागेवर स्थान मिळू शकते, असे भाष्य प्रसाद यांनी केले आहे.
अशी आहे किशनची आयपीएलच्या तेराव्या हंगामातील कामगिरी...
आयपीएलच्या तेराव्या हंगामात इशान किशनने १४ सामन्यांत ५१६ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या जागी निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली, परंतु वर्षभरात पंतने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुल आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय भारतीय संघाने आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहेत. मात्र, आता इशान किशन देखील यांच्या रांगेत आला आहे. किशनच्या दमदार कामगिरीने भारतीय संघाची दारे आता उघडली जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - हैदराबाद केन विल्यमसनला सोडणार का?, कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिले 'हे' उत्तर
हेही वाचा - 'विराटची टी-२०चे कर्णधारपद सोडण्याची वेळ आली; रोहितने संघाचे नेतृत्व करावं'