मुंबई - कोरोनामुळे, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नियोजित असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या काळात आयपीएल स्पर्धा खेळवली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या कार्यकारिणीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे 18 ऑक्टोबरपासून सुरू होणारी विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात येण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. याशिवाय या काळात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारने घेतला आहे. तसेच विश्वकरंडकाविषयी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या काळात आयपीएलच्या आयोजनाचा विचार बीसीसीआय करू शकते, असे गायकवाड यांना वाटते.
आयपीएलबाबत गायकवाड म्हणाले, 'ऑस्ट्रेलियात नियोजित टी-20 विश्वकरंडक होण्याची शक्यता दिसत नाही. पण, आयपीएलबाबतही ठामपणे सांगणे योग्य ठरणार नाही. जर विश्वकरंडक रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यानच आयपीएलचे आयोजन करता येऊ शकते.'
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलच्या आयोजनावर भारतीय खेळाडूंनी सर्वप्रथम तयारी दर्शवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे देशातील स्थिती कितपत सुधारली आहे, याचा आढावा घेणेही गरजेचे आहे, असेही गायकवाड म्हणाले.
कोरोनानंतरच्या काळातील क्रिकेट फार बदललेले असेल. प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये तसेच संघ सहकाऱ्यांच्या जवळ जाऊन जल्लोष न करता सामने खेळण्याची खेळाडूंना सवय करावी लागेल. त्याशिवाय पुढील 2-3 महिने तरी भारतातील क्रिकेट सुरू होण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे खेळाडूंनी मानसिकदृष्टय़ा तयार असणे आवश्यक आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, यंदा आयपीएल न झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) जवळपास 4000 कोटींचा नुकसान सहन करावा लागेल, अशी शक्यता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत बीसीसीआय सर्व शक्यतांची चाचपणी करून पाहात आहे. पण यासाठी देशातील परिस्थिती पूर्ववत होणे गरजेचे आहे. यावर आयपीएलच्या 13 हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.
हेही वाचा - करिअरच्या सुरूवातीला 'या' गोलंदाजाला खेळणं कठीण ठरलं - विराट
हेही वाचा - बीसीसीआय 'या' महिन्यांत आयपीएलचे आयोजन करण्याच्या तयारीत?