चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन तुल्यबळ संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आयपीएलचा १३वा हंगाम कोरोनामुळे युएईमध्ये खेळवण्यात आला होता. यात रोहितच्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यामुळे यंदाही मुंबईलाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
मुंबईच्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा -
मुंबई इंडियन्सच्या संघात कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या संघात केरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट या स्टार परदेशी खेळाडू आहेत. यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबईचे पारडं जड मानले जात आहे.
बंगळुरूची मदार विराट-डिव्हिलियर्सवर
दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात, विराटसह युवा देवदत्त पडीक्कल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तसेच एबी डिव्हिलियर्स, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन देखील बंगळुरूत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील सामना रोमांचक होण्याची आशा आहे. दरम्यान, उभय संघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटाला सुरूवात होईल.
मुंबई इंडियन्स स्क्वाड :
रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृनाल पांड्या, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ख्रिस लीन, मोहसिन खान, सौरभ तिवारी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, नाथन कूल्टर नाइल, पीयूष चावला, जेम्स नीशम, युधिवीर चरक, मार्को जानसेन आणि अर्जुन तेंदुलकर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्क्वाड :
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वाशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन एलेन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम ज़म्पा, कायले जेमीन्सन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अजहरुद्दीन, डॅनियल ख्रिश्चियन, केएस भारत, सुयश प्रभुदेसाई, डॅनियल सैम्स आणि हर्षल पटेल.
हेही वाचा - IPL २०२१ : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! रोहितने आयपीएलपूर्वीच दाखवला फटकेबाजीचा ट्रेलर
हेही वाचा - आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPL साठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडली; आफ्रिदी भडकला, म्हणाला...