चेन्नई - गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाला सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत व्हावे लागले. मुंबईच्या सलामीच्या सामन्यातील पराभवाची मालिका कायम राहिला. मुंबईचा संघ २०१३ पासून अद्याप सलामीचा सामना जिंकू शकलेला नाही. दरम्यान, बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा ख्रिस लीनच्या चुकीच्या कॉलवर धावबाद झाला होता. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर लीनने ४९ धावांची खेळी केली होती. परंतु सामना संपल्यानंतर त्याने हसत हसत, कदाचित हा सामना माझा पहिला आणि अखेरचा सामना ठरेल, अशी भीती व्यक्त केली होती. त्याची ही भीती खरी ठरली आहे.
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी मुंबई संघाचे सल्लागार समितीचा सदस्य झहीर खान याने मोठी घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक कोलकाता विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती जहीरने दिली आहे.
क्विंटन डी कॉकने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, डी कॉकने युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या मागील हंगामात सलामीला येत दमदार फलंदाजी केली होती. त्याने मागील हंगामात १६ सामन्यांत ३५.९२ च्या सरासरीने ५०३ धावा केल्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएल २०२१ च्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा जोडल्या. बंगळुरूने हे लक्ष्य शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून पूर्ण केले.
हेही वाचा - IPL २०२१ : असा पराक्रम फक्त ख्रिस गेलच करू शकतो, 'या' विक्रमापासून रोहित, विराटसह मातब्बर कोसो दूर
हेही वाचा - IPL २०२१ : केन विल्यमसनबाबत मोठी अपडेट; खुद्द प्रशिक्षकांनी दिली माहिती