आबुधाबी - रंगतदार ठरलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला मात दिली. बंगळुरूने या विजयासह गुणातालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. पण, या सामन्यात देखील कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला. विराटला या हंगामात झालेल्या तीन सामन्यात पूर्णपणे अपयश आले आहे. त्याला अद्याप आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
विराट कोहलीची गणना जगभरातील प्रमुख खेळाडूंमध्ये केली जाते. पण तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात त्याची बॅट अद्याप तळपलेली नाही. तो तीन सामन्यात फक्त १८ धावाच करु शकला आहे. पहिल्या तीन सामन्याचा विचार केला तर आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीची ही सर्वात खराब कामगिरी आहे.
विराट आयपीएलच्या १३ व्या हंगामात हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १४ धावांवर, पंजाबविरुद्ध १ धावेवर आणि मुंबईविरुद्ध ३ धावांवार बाद झाला आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये पहिल्या तीन सामन्यात १८७ धावा काढल्या होत्या. विराट कोहलीच्या पहिल्या तीन सामन्यातील या सर्वाधिक धावा आहेत.
पहिल्या तीन सामन्यात अशी आहे विराट कोहलीची कामगिरी –
- २००८ - ३७ धावा
- २००९ - ६४ धावा
- २०१० - ३५ धावा
- २०११ - १०६ धावा
- २०१२ - ७१ धावा
- २०१३ - १६३ धावा
- २०१४ - ८० धावा
- २०१५ - ७२ धावा
- २०१६ - १८७ धावा
- २०१७ - १५४ धावा
- २०१८ - १०९ धावा
- २०१९ - ५५ धावा
- २०२० - १८ धावा