मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा थरार १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. तर काही संघ रवाना होण्यासाठी सज्ज आहेत. आयपीएलच्या या हंगामाची उत्सुकता भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पसंतीच्या संघांना शुभेच्छा देत आहेत. यावरुन या स्पर्धेची लोकप्रियता लक्षात येते. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होऊन 'दम' दाखवतात. यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. अशाच विक्रमाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे विक्रम कदाचित पुढेही तुटणार नाहीत. वाचा कोणते आहेत ते विक्रम...
एका हंगामात सर्वाधिक धावा -
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने २०१६ च्या आयपीएल हंगामात खेळताना धावाचा पाऊस पाडला. त्याने या हंगामात ९७३ धावा झोडपल्या. विशेष बाब म्हणजे, विराटची बॅट तळपून देखील आरसीबीचा संघ स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकला नाही.
हॅट्ट्रिकचा असाही विक्रम -
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी गोलंदाजामध्ये अमित मिश्राचे नाव टॉपवर आहे. त्याने आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रीक घेतल्या आहे. असा कारनामा कोणत्याही अन्य खेळाडूला करता आलेला नाही. अमित मिश्राने २००८, २०११ आणि २०१३ या आयपीएलच्या हंगामात खेळताना हॅट्ट्रीकची किमया साधली. आयपीएल इतिहासात आतापर्यंत १५ गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतल्या आहेत.
एका डावात सर्वात यशस्वी विक्रमी गोलंदाजी -
आयपीएलच्या सामन्यात एका डावात सर्वात श्रेष्ठ गोलंदाजी करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरच्या नावे होता. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना १४ धावा देत ६ गडी तंबूत धाडले होते. तन्वीरचा हा विक्रम अल्झरी जोसेफने मोडला. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना जोसेफने सनरायजर्स हैदराबाद विरोधात १२ धावात ६ गडी टिपले होते. हा विक्रम मोडणे सद्य घडीला कठिण आहे.
हेही वाचा - निवृत्ती घेतली अन पाच मिनिटांत धोनी भेटला 'या' माजी खेळाडूला...
हेही वाचा - इरफानने धोनीसह निवडला निवृत्तीच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूंचा संघ; विराटच्या संघाशी घ्यायचाय 'पंगा'