दुबई - आयपीएल २०२० स्पर्धेसमोरील अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जचे १३ सदस्य कोरोनाबाधित आढळले. यानंतर आता बीसीसीआयच्या मेडिकल टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. एएनआयने यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, अधिकाऱ्यांनी याची पूष्टी केली आहे. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, मेडिकल टीमच्या सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. पण, अद्याप बीसीसीआयने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मागील आठवड्यात चेन्नईच्या दोन खेळाडूंसह स्टापमधील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे. ही घटना ताजी असताना, आता मेडिकल टीममधील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीएसकेचे सीईओ विश्वनाथन यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित सदस्य वगळता अन्य सदस्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात धोनीसह सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सीएसकेचा संघ शुक्रवार पासून ट्रेनिंग सुरू करु शकतो. दीपक चहर आणि गायकवाड हे १४ दिवस क्वारंटाइन असतील. आम्ही बीसीसीआयने दिलेल्या सर्व प्रोटोकॉलचे कठोर पालन करत आहोत. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते पुन्हा काही दिवस क्वारंटाइन राहतील आणि त्यानंतर ट्रेनिंगला सुरुवात करतील.
हेही वाचा - IPL २०२० : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 'मॅचविनर' खेळाडू स्पर्धेतून बाहेर
हेही वाचा - 'सरफराज अहमद क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये जांभई देणारा ठरला जगातील पहिला खेळाडू '