दुबई - मनीष पांडे (८३) आणि विजय शंकर (५२) यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावत तिसऱ्या गड्यासाठी ९३ चेंडूत केलेल्या नाबाद १४० धावांच्या भागिदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचं आव्हान मिळालं होतं. परंतू या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि बेअरस्टो जोडी स्वस्तात माघारी परतली. यानंतर मनिष पांडे आणि विजय शंकर यांनी सुरूवातीला सावध खेळ केला आणि जम बसल्यानंतर दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत, अभेद्य भागीदारी करत दोघांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली.
राजस्थानने विजयासाठी दिलेल्या १५५ धावांच्या पाठलाग करताना हैदराबादची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या चार धावा काढत बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने बेन स्टोक्स करवी झेलबाद केले. यानंतर ऑर्चरनेच त्याच्या पुढच्या षटकात हैदराबादला दुसरा झटका दिला. त्याने जॉनी बेअरस्टोला (१०) माघारी धाडले. यामुळे हैदराबादची अवस्था २.४ षटकात २ बाद १६ अशी झाली होती. मनीष पांडे-विजय शंकर या जोडीने सुरूवातीला सावध खेळ केला. जम बसल्यानंतर दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद १४० धावांची भागिदारी केली. या दरम्यान मनीष पांडने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मनीष पांडेने ४७ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. त्याने यात ४ चौकार आणि ८ षटकार लगावले. विजय शंकरने नाबाद ५२ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे. राजस्थानकडून जोफ्रा ऑर्चरने २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, राजस्थानला रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स या जोडीने ३.३ षटकात ३० धावांची सलामी दिली. स्टोक्स आणि उथप्पा यांच्यात धाव घेण्यात गडबड झाली आणि होल्डरच्या थेट फेकीवर उथप्पा धावबाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि बेन स्टोक्सने संघाचा डाव सावरला. दोघांनी मैदानाच्या चौफैर फटकेबाजी करत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. संजू सॅमसनचा अडथळा होल्डरने दूर केला. त्याने त्याला १२ व्या षटकात वैयक्तिक ३६ धावांवर असताना क्लिन बोल्ड केले. यानंतर पुढच्या षटकात राशिद खानने बेन स्टोक्सला क्लिन बोल्ड करत राजस्थानला मोठा धक्का दिला. स्टोक्सने ३० धावा केल्या.
स्टिव्ह स्मिथ आणि जोस बटलर या जोडीने १५व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. पण मोठा फटका मारण्याच्या नादात जोस बटलर (९) बाद झाला. विजय शंकरच्या गोलंदाजीवर शाहबाज नदीमने त्याचा झेल टिपला. यानंतर स्टिव्ह स्मिथ-रियान पराग या जोडीने सुरूवातीला सावध खेळ केला. १८व्या षटकात टी. नटराजनच्या गोलंदाजीवर दोघांनी १६ धावा वसूल केल्या. परागने नटराजनला १ चौकार आणि १ षटकार लगावला. १९व्या षटकात होल्डरने राजस्थानला दोन धक्के दिले. त्याने पहिल्यांदा स्मिथला माघारी धाडले. उंचावून मारण्याच्या नादात उडलेला झेल सीमारेषेवर मनीष पांडेने टिपला. स्मिथने १९ धावा केल्या. यानंतर त्याने फटकेबाजी करत असलेल्या परागला बाद केले. परागचा (२०) झेल वॉर्नरने घेतला. यानंतर राहुल तेवतिया (२) आणि जोफ्रा आर्चर (१६) यांनी राजस्थानला दीडशेचा पल्ला गाठून दिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३ गडी बाद केले. तर राशिद खान, विजय शंकर यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.