शारजाह - राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपई किंग्सवर 16 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस यांने अर्धशतक झळकावत 7 षटकारांसह सर्वाधिक 72 धावा केल्या. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याला राजस्थानच्या जोफ्रा आर्चर या गोलंदाजाने बाद केले. त्याच्यापाठोपाठ शेन वॉटसन याने 33, केदार जाधव याने 22, मुरली विजय याने 21, सॅम कुर्रान याने 17 धावा केल्या. यानंतर कर्णधार धोनीने शेवटच्या षटकांत सलग तीन षटकार लगावत 17 चेंडूत नाबाद 29 धावा करत संघाची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचवली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकारे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 16 धावांनी विजय मिळवला.
राजस्थानकडून राहुल तेवातिया या गोलंदाजाने 4 षटकांत 37 धावा देत सर्वाधिक 3 मिळवले. यानंतर जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, टॉम कुर्रान यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. सामनावीराचा पुरस्कार राजस्थानच्या संजू सॅमसनला देण्यात आला. त्याने 32 चेंडूत 9 षटकारांसह 74 धावा केल्या होत्या.
तत्पूर्वी, संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 216 धावांचा डोंगर उभा केला. सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 200 धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या तर स्मिथने कर्णधाराला साजेशी खेळी करत 69 धावा जोडल्या.
चेन्नईने नाणेफेक जिंकली. तेव्हा अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सलामीला येण्याचा निर्णय घेतला. पण राजस्थानची सुरूवात खराब झाली. पदार्पणाचा सामना खेळणारा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (6) तिसऱ्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. बाऊंसर चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जागच्या जागी हवेत उडाला, चहरने तो सहज टिपला. यानंतर स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सावरला.
सॅमसन स्मिथ या जोडीने चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. सॅमसनने पीयूष चावलाच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. स्टीव्ह स्मिथनेही दुसऱ्या बाजूने दमदार फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने दहा षटकांत 1 बाद 119 धावांची मजल मारली. पण 12 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सॅमसनचा झंझावात लुंगी एनगिडीने रोखला. त्याच्या गोलंदाजीवर दीपक चहरने झेल टिपला. सॅमसनने 32 चेंडूंत 1 चौकार व 9 षटकारासह 74 धावा केल्या. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेवीड मिलर धावबाद झाला. यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली.
रॉबिन उथप्पा (5), राहुल तेवतिया (10), रियान पराग (6) ठराविक अंतराने बाद झाले. दुसऱ्या बाजूने स्मिथ अर्धशतक पूर्ण करुन बाद झाला. स्मिथने 47 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावा केल्या. त्याला सॅम करनने बाद केले. स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या जोफ्रा आर्चरने तुफानी खेळी केली. त्याने एनगिडीचा 20 षटकात खरपूस समाचार घेतला. त्याच्या अखेरच्या षटकात आर्चरने 4 षटकार खेचले तो 8 चेंडूत 27 धावांवर नाबाद राहिला. सॅम करनने तीन गडी बाद केले. तर जडेजा, एनगिडी, पियुष चावला यांनी प्रत्येकी 1-1 गडी टिपला.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ -
मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड़, केदार जाधव, एमएस धोनी (कर्णधार ), रवींद्र जडेजा, सॅम करन, दीपक चाहर, पीयूष चावला आणि लुंगी एनगिडी
राजस्थान रॉयल्सचा संघ -
यशस्वी जैस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), स्टीव स्मिथ (कर्णधार ), डेविड मिलर, टॉम करन, रियान पराग, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, राहुल तेवतिया आणि जयदेव उनादकट.