अबुधाबी - आयपीएल २०२०मध्ये आज राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात दिवसा सामना खेळला जाणार आहे. मागील सामन्यात कोलकाताविरुद्धचा पराभव विसरून राजस्थान विजयासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे, मुंबईविरुद्धच्या विजयाने बंगळुरूचा आत्मविश्वास दुणावला आहे. आयपीएलच्या सुरू असलेल्या तेराव्या हंगामात १० दिवस दोन सामने होणार आहे. त्याची सुरुवात आजच्या सामन्याने होईल. दिवसा होणाऱ्या सामन्यात दव नव्हे तर, उन्हाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
राजस्थानच्या संघाने मागील सामन्यातील पराभव वगळता तेराव्या हंगामात चांगली कामगिरी नोंदवली आहे. राजस्थानचे फलंदाज स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन चांगल्या लयीत आहेत. पण, जोस बटलरचा फॉर्म राजस्थानसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला खेळवण्याची मागणी होत आहे, तथापी बटलर आघाडीच्या फळीत खेळणार असल्याने यशस्वीला संधी मिळाली तरी तो मधल्या फळीत येईल. राहुल तेवातिया, रेयान पराग, रॉबिन उथप्पा यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चर, जयदेव उनाडकट, टॉम करन कसदार मारा करीत आहेत.
दुसरीकडे आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. पण, आरसीबीच्या या विजयात कर्णधार विराट कोहली फेल ठरला. त्याला अद्याप या हंगामात लौकिकास पात्र कामगिरी करता आलेली नाही. ही आरसीबीसाठी चिंतेची बाब आहे. एबी डिव्हिलिअर्स आरसीबीसाठी सातत्याने धावा करत आहे. शिवम दुबे याने देखील मागच्या सामन्यात उत्तुंग फटकेबाजीद्वारे कौशल्य सिद्ध केले होते. आजच्या सामन्यात अॅरोन फिंचकडून मोठ्या खेळीची अपेक्षा संघाकडून असणार आहे.
आरसीबीने मागच्या सामन्यात इसुरू उदाना, अॅडम झम्पा आणि गुरकिरत मान यांना संघात स्थान दिले होते. हे तिन्ही खेळाडू उद्या देखील कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वॉशिग्टन सुंदर याच्याकडून गोलंदाजीला सुरुवात करून घेण्याचे डावपेच मागच्या सामन्यात यशस्वी ठरले होते. याशिवाय नवदीप सैनीने मागील सामन्यात चांगला मारा केला होता. युजवेंद्र चहल आरसीबीसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
- विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडीक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.
- राजस्थान रॉयल्सचा संघ -
- जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीवन स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयांक मारकंडे, महिपाल लोमरोर, ओसाने थॉमस, रेयान पराग, यशस्वी जैस्वाल अनुज रावत, आकाश सिंह, डेविड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.