दुबई - रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ पाचवे विजेतेपद पटकवण्यासाठी उत्सुक आहे. पण, यंदा त्यांच्याकडे हुकमी एक्का लसिथ मलिंगा नाही. मलिंगाने वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. अशात मलिंगाची जागा कोण घेणार? याची चर्चा सुरू आहे. यावर खुद्द कर्णधार रोहित शर्मानेच माहिती दिली आहे.
रोहित एका व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्स दरम्यान म्हणाला, लसिथ मलिंगाची जागा भरणे कठीण आहे. कारण मलिंगाने अनेक सामने मोक्याच्या क्षणी गडी बाद करत जिंकून दिले आहेत. जेव्हा संघ अडचणीत आला, तेव्हा मलिंगा नेहमी संघासाठी धावून येत होता. त्याचा अनुभवाला आम्ही यावेळी मिस करू. त्याने मुंबई संघासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे.
यंदाच्या हंगामात मलिंगा खेळणार नाही. त्याच्या जागेवर नॅथन कूल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन किंवा धवल कुलकर्णी यापैकी एकाची वर्णी लागू शकते. मात्र लसिथ मलिंगाची जागा भरणे कठीण आहे, असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, लसिथ मलिंगाने आयपीएलमधील १२० सामन्यात खेळताना १७० गडी बाद केले आहे. पण, यंदा तो वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही. मुंबई इंडियन्सचा संघ सलामीचा सामना खेळणार असून चेन्नई विरोधात १९ सप्टेंबरला ते आबूधाबीमध्ये मैदानात उतरतील. यंदाचा हंगाम कोरोनामुळे यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे.
हेही वाचा - IPL २०२० : रोहित म्हणतो, मी पुन्हा येणार... वाचा काय आहे प्रकरण