दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत दमदार कामगिरी नोंदवलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्याचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे पुढील काही सामन्यातून बाहेर झाला आहे. याची माहिती दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिली. पंतची दुखापत दिल्लीसाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. तो क्षेत्ररक्षण दरम्यान, लंगडताना पाहायला मिळाला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. आता त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
पंतच्या दुखापतीविषयी कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, 'मी डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं आहे की, पंतला किमान एक आठवडा तरी आराम करावा लागणार आहे. पण, पंत कधी संघात परतणार याविषयी आत्ताच सांगणे कठीण आहे.'
दरम्यान, पंतने तेराव्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. त्याने ६ सामन्यात १३३ च्या स्टाइक रेटने १७६ धावा केल्या आहेत. पंत दिल्लीसाठी महत्वाचा खेळाडू आहे. जर पंतची दुखापत गंभीर असली आणि तो आयपीएलमधून बाहेर पडला तर हा दिल्लीसाठी मोठा धक्का असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - SRH vs RR : राहुल तेवातिया आणि खलील अहमद यांच्यात भांडण, पाहा व्हिडीओ
हेही वाचा - IPL 2020 : चेन्नईच्या संघासाठी चाहत्यांनी बनवला खास व्हिडीओ