दुबई - दिल्ली कॅपिटल्स संघाने सोमवारी रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा ५९ धावांनी पराभव करत, चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. दिल्ली विरुद्ध बंगळुरू सामन्यानंतर गुणतालिकेत कोणते बदल झाले, पाहा...
दिल्ली विरुद्ध बंगळुरू या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. या यादीत मुंबईचा संघ पहिल्या स्थानावर होता. दिल्लीने यापूर्वी झालेल्या चार मधील तीन सामन्यामध्ये विजय मिळवले होते, तर एक पराभव त्यांच्या पदरी पडलेला होता. शनिवारी दिल्लीने आरसीबीचा पराभव करत अव्वल स्थान पटकावले.
दुसरीकडे या सामन्यापूर्वी आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकून अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी होती. यापूर्वी आरसीबीने चार सामन्यात तीन विजय मिळवले होते. पण बंगळुरूला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले.
सध्याच्या घडीला गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वलस्थानी आहे. तर मुंबईचा दुसरा आणि आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत केकेआरचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सने पाचवे स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - आयपीएल २०२०मधील 'हार्ड हिटर', काही ठरले सुपरहिट तर काही... जाणून घ्या कामगिरी
हेही वाचा - डू प्लेसिस-वॉटसन या सलीमीवीर जोडीने IPL मध्ये रचला इतिहास; केले अनेक विक्रम