अबुधाबी - आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅप मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला.
या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. आत्तापर्यंत आयपीएल २०२०मध्ये फाफ डु प्लेसिसने तीन सामन्यात सर्वाधिक १७३ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. त्याच्यापाठोपाठ किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल असून त्याच्या नावावर १५३ धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मयांक अग्रवाल असून, त्याने ११५ धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत कगिसो रबाडा पहिल्या स्थानावर आहे. रबाडाने दोन सामन्यात ५ गडी बाद केले. दुसर्या क्रमांकावर सॅम करन आहे, ज्याने तीन सामन्यांत ५ बळी घेतले आहेत. मात्र, रबाडाची इकॉनॉमी चांगली असल्याने त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. पंजाबचा मोहम्मद शमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ४ बळी जमा आहेत.
संघाच्या यादीत श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीने दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांच्यापाठोपाठ पंजाब, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आहेत.