नवी दिल्ली - आयपीएलच्या ४९व्या सामन्यानंतर लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.
चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १२ सामन्यांत ५९५ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १२ सामन्यात ४७१ धावा आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर १२ सामन्यात ४३६ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे आहे. रबाडाने १२ सामन्यांमध्ये एकूण २३ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा जसप्रीत बुमराह असून त्याच्या खात्यात १२ सामन्यात २० बळींची नोंद आहे. त्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पंजाबचा मोहम्मद शमी आहे. त्याच्या खात्यात २० बळी आहेत.
गुणतालिकेची सद्यस्थिती -
सद्याच्या घडीला प्लेऑफसाठी पात्र ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. गुरुवारी चेन्नईने कोलकाताला पराभूत केल्याने मुंबईचे बाद फेरीचे स्थान पक्के झाले. मुंबईचे एकूण १६ गुण झाले असून त्यांचे दोन सामे बाकी आहेत. तर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने गुणतालिकेतील तिसरे स्थान मिळवले आहे.